“राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
मृदू देशा कोमल देशा फुलांच्याही देशा “

पावसाळा आता ‘ खरोखर ‘ संपला होता. नोव्हेंबर येऊन संपू पण लागला, पण शहरात थंडीचा लवलेश ही नव्हता. जी काही थंडी अनुभवायला मिळणार ती अर्थातच गावात. शांत वातावरण, निरभ्र आकाश आणि त्यात केलेलं कॅम्पिंग.. पावसाळा यावर्षी दमदार च झाल्यामुळे ऐन रात्री नाणेघाट चा प्लॅन रद्द करावा लागला होता. माझ्या ऑफिस मधल्या सर्वांनाच त्यामुळे फिरायला जायची उत्सुकता होतीच. त्यात एक मित्र देवकुंड ला जाऊन आलेला; आपण इथेच जाऊयात फार मजा येईल म्हणून सर्वांच्या मागे लागला. गेल्या पावसाळ्यात सोशल मीडिया वर सर्वात जास्त याच जागेचे फोटोज् झळकत होते. त्यामुळे सर्वांनी होकार दिला आणि देवकुंड ला जाण्याचे ठरले! एक मित्र अगोदर जाऊन आला होता, त्यामुळे जिथे कॅम्पिंग ला जायचं होतं तिथली सर्व व्यवस्था त्यानेच बघितली आणि माझा भार जवळजवळ शून्य च केला (नाहीतर सगळ्या गोष्टी ठरवायचे केंद्रस्थानी मी असतोच!). पटणुस ला जाणाऱ्या रस्त्यातच पाली गाव आहे. तर आपण गावी पोचण्या अगोदर पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊ आणि मग पुढे फिरू आणि क्रिकेट वगैरे खेळून वेळ घालवू असा काहीसा प्लॅन केला. सगळं ठरवल्या नुसार घडलं तर त्यात मजा कसली?

पालीचा बल्लाळेश्वर गणपती

सकाळी ७:३० ला कल्याण वरून निघालो आणि ८ वाजता कोपरखैरणे ला पोचलो. एकाला उशिरा यायची सवयच आहे, पण १५-२० मिनिटे ठीके, साहेब १ तास उशिराने आले! त्यादिवशी पहाटे च राजकीय वातावरण ही तापले होते आणि आमचा सगळा राग त्याच्यावर निघाला.. ( राज्यपालांना पहाटे उठवलं होतं तेव्हा घाई गडबडीत, आठवेलच सर्वांना आता) दुपारी १२ ला बल्लाळेश्वर च्या देवळात आम्ही पोचलो आणि गणपतीची ती मूर्ती पाहून फार छान व प्रसन्न वाटले. ऊन जास्त लागत होतं, सर्वांनी चमच्च गोळ्यावर आणि सरबत वर तहान भागवली. पालीचे मुकुट असलेला सरसगड आणि त्यावरचा भगवा लांबून खुणावत होता. तिथे एका मुलाला मिरगुंड आणि पोह्याचा पापड यातला फरक समजवून सांगितला. तरी मराठीच आहे तो.. असो! तिथून निघताना अचानक सर्वांना आठवलं की एकाचा वाढदिवस आहे आज! मग काय पाली गावात गाडी फिरवून केक घेतला आणि पटनुस ला निघालो. प्रत्यक्ष पोचल्यावर कळलं की आम्ही पटनुस नाही तर दुसऱ्या गावात (म्हसेवाडी) आलोय. पोचलो ते गाव बरोबर होतं पण वेळ नव्हती. कुठेतरी वेळेच्या आधीच पोहोचायची ही पहिली वेळ असेल. दुपारी ३:३० ते ५:३० आता काय करायचे हा मोठा प्रश्न होता. जेवणही सोबत नव्हते. तिथला व्यवस्थापक आम्हाला गावातल्या धरणावर घेऊन गेला. तुमची व्यवस्था होईस्तोवर इथेच थांबा, असं सांगून निघून गेला. बर्थ डे बॉय चा केक कापून झाला आणि जरासाही न सांडता फस्त केला.  आता ऊन थोडे कमी लागत होते. यावेळी आमच्यात बरेच फोटोग्राफर होते. त्यात एवढी छान साथ निसर्ग देत होता म्हणून सगळेच जण फोटो काढण्यात बिझी झाले. दोन तास कधी निघून गेले हे कळलेच नाही. शेवटी तो माणूस आला आणि आम्हाला कॅम्पिंग साईट वर घेऊन गेला.

Campsite

कँपिग साईट गावापासून थोडी लांब होती. ही जागा माती टाकून पूर्णपणे सपाट केलेली. बाजूला व्हॉलीबॉल च ग्राउंड. तर खाली छोटासा ओढा. या पलीकडे होतं ते फक्त शेत. १५-२० टेंट त्या जागी रचलेले होते. सगळे त्या जागी पोचलो  आणि थोडेसे सुस्तावलो. काहीजण क्रिकेट खेळू लागले तर काही व्हॉलीबॉल. काही खालच्या ओढ्यात जाऊन बसले तर काही आजूबाजूला फिरू लागले. व्हॉलीबॉल मी तरी तिथे पहिल्यांदाच खेळलो. एवढा उत्साह होता की मी माझ्याच टीमच्या मुलाच्या तोंडावर बॉल मारला. नशीब सुजलं नाही काही. एवढ्या जोशात खेळून सगळ्यांनी आपला रोख कॅरम कडे वळवला. आता मात्र सूर्याच्या पिवळ्या – केशरी छटांनीही निरोप घेतला आणि उत्साहाने ही. कारण एवढं सगळं करून सर्वांना भुका लागल्या होत्या. आणि पहिल्यांदा कोणीही काहीच खायला आणलं नव्हतं. त्यात कोणीतरी चिवडा आणि बिस्कीट आणलं आणि झालं! सगळे तुटून पडले. दुपारी जेवण तर झालंच नव्हतं. सगळे जण भुकेने व्याकुळ झालेले आता barbeque ची वाट पाहत होते. कधी ते आलं आणि संपलं कोणाला काहीही समजलं नाही. आता छान काळोख पडला होता आणि लाखो ताऱ्यांची साथ होती. एक छोटा music program सुद्धा होता. जेवणं झाली आणि सर्वांनी आपल्या नजरा ताऱ्यांकडे वळवल्या. एक से एक फोटोग्राफर असल्याने सारेच लोक या दुनियेत रममाण झाले. मी सुद्धा थोडावेळ फोटो काढून मग कॅमेरा बॅगेत ठेऊन दिला आणि शांतपणे बसलो.

The night sky
The night sky!

रात्र जसजशी पुढे सरकत होती, तसतशी थंडी वाढत होती. आता मात्र अगदी हवे तसे वातावरण निर्माण झाले होते. सर्वदूर शांतता, मिट्ट काळोख आणि आपल्याशी संवाद साधायला उत्सुक असलेले असंख्य तारे. आकाशातले तारे, चांदण्या ह्यांची पण एक खासियत असते राव, आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाण्याची. नाहीतर का कोण ह्यांच्या निरीक्षणात तासंतास गढून राहतं? त्यांचं लुकलुकणं पाहताना आपण आपल्यात कधी हरवून जातो, आपल्या भावविश्वात कधी शिरतो, आपल्यालाच कळत नाही. अनेक विचारांची गर्दी आपल्या या मनात असते. काही विषय आपल्याला जगापेक्षा मोठे वाटतात. काहींची उत्तरं नसताना देखील तेच आपण घोळवत राहतो. का, हे मात्र कळत नाही. अशाच वेळी या चांदण्या मनाचा वेध घेतात आणि आपले काही विचार किती छोटे, निरर्थक आहेत याची जाणीव करून देतात. हे सगळं मात्र या शांततेच होतं, म्हणजे आजूबाजूची. कमाल आहे ना या गोष्टीची? जेवढी शांत रात्र, तेवढंच ‘ loudest mind’. आणि जेवढी काळोखी रात्र असेल तेवढे दडलेले तारे आपल्याला सहज दिसतात, नाही का? कितीही हा संवाद साधला तरी कमीच पडतो कधी कधी. बराच उशीर झालेला, मी आपलं आवरतं घेतलं आणि थोडावेळ जाऊन झोपलो, सकाळी उठायचं होतं ना लवकर! प्रातः विधी प्रात समयीच व्हावी त्यासाठी लवकर उठायचे होते ना.. नाहीतर आजूबाजूच्या शेतात साप होते म्हणे, काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी!

कॅम्पसाईटच्या बाहेरील रस्ता

सकाळी सर्व जणं आवरून, नाष्टा करून भिरा गावी जायला निघालो. ५-६ किमी चा रस्ता. भिरा गावात टाटा पॉवर चा मोठा प्लांट आहे. संपूर्ण गाव टाटा च्या अंडर आल्याने गावाचा छान विकास झाला आहे. गावाच्या शेवटी आहे ते भिरा गावातले कुंडलिका नदीवर बांधलेले मोठे धरण आहे. इथून देवकुंड चा ट्रेक चालू होतो. देवकुंड हे पूर्णपणे ‘ टुरिस्ट स्पॉट’ झाले आहे. त्यामुळे निसर्गाची काळजी घेण्यासाठी वनविभाग ही आहेच. मुबलक प्रमाणात पार्किंग व्यवस्था सुद्धा आहे. सगळ्यांकडून प्रवेश शुल्क आणि गाईड ची व्यवस्था आहे. खरंतर इथे गाईड ची गरज नाही, पण काहीतरी मोनोपोली असावी. आमचा ग्रुप मोठा असल्याने २ गाईड होते, एक पुढे आणि एक मागे. बहुतेक इथे सर्वांनाच गाईड ची सक्ती केली जाते जशी शाळेत केली जाते.. आणि या सर्वांसोबत आमचा ट्रेक चालू झाला.

कुंडलिका नदी
On the way

मोठ्या व रुंद नदी पात्रातून अरुंद ओढ्या पर्यंत चा प्रवास म्हणजे देवकुंड. देवकुंड हे कुंडलिका नदीचे उगमस्थान असे म्हणतात. ऋषीचे कूळ व नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात पण इथे नदीचे मूळ तर टुरिस्ट चे केंद्र आहे. आपण नदीच्या छोटं होत जाणाऱ्या पात्रासोबत चालत जातो. सोबत असलेला गाईड तिथली माहिती सांगत होता. पावसाळ्यात भीरा पूर्ण गाड्यांनी भरलेलं, अगदी ४-५ किमी रांग लागली होती. लोकं पण हुशार अगदी. निसर्गाचा आस्वाद घेताना आपल्या प्लास्टिक खुणा जंगलात सोडूनच जातात. तर वनविभाग २ दिवस ट्रेक बंद ठेऊन पूर्ण जंगलाची सफाई करते. तसेच वृक्षलागवड आणि वनस्पतींची जपणूक हे कामही केले जाते. मी आधी सर्वात शेवटी चालत होतो. तर गाईड म्हणतो, अरे पुढे तर ९०° चढायचं आहे, चला भरभर. बहुतेक मला बघूनच बोलला असेल तो कारण तसा भारदस्त आहे ना मी.. जाऊद्या काय बोलणार. नंतर पुढच्या गाईड शी सलगी केली आणि माहिती मिळवू लागलो. आजतागायत कोणालाही देवकुंड ची खोली कळाली नाही, असे तो सांगत होता. काही उत्साही तरुण खोलीवर जातात आणि अंदाज न आल्याने बुडतात हे ही सांगितले. मधेच जंगल, मधेच मैदान, मधेच मोठाले दगड असा पूर्ण रस्ता आहे. मागे उभा असलेला ताम्हिणी घाट सोबत होताच. शेवटी तो ९०° चा चढ आला आणि आम्ही कधी पार कळले ही नाही. या भागात एवढी दाट झाडी होती की सूर्यप्रकाश ही पोहचू शकत नव्हता. आता शेवटचा टप्पा बाकी होता तो दगडांचा. इथे पोचलो आणि जे काही बघितले ते अविस्मणीय होते. दोन डोंगरांच्या मध्यात सूर्यकिरणे reflect होऊन हिरवा पिवळा रंग उधळत होते. तिथून थोडच पुढे माथ्यावरून आपली वाट काढून देवकुंड चा धबधबा कोसळत होता. त्याखाली होते त्या निळ्याशार पाण्याचे कुंड. अगदी देवानेच या जलकुंडाची निर्मिती केली आहे असेच वाटावे, म्हणूनच नाव देवकुंड! अगदी स्वच्छ, निर्मळ पाणी माणसांची गर्दी असून सुध्दा! अगदी नाही म्हटलं तरी शे दीडशे फोटो सर्वांनी इथे काढले असतील. आजकालची enjoyment ची पद्धत आहेना ही. नंतर या अतिशय स्वच्छ पाण्यात डुंबण्याच्या मोह कोणालाही आवरता आला नाही. मी मात्र नेहमीप्रमाणे लांब बसून त्या अविरत कोसळणाऱ्या जलधारे कडे पाहत बसलो. काय ती किमया आणि किती ते रम्य वातावरण. भर उन्हात थंडी वाजू लागली होती. डुंबून तिथे गरमागरम वडापाव खाऊन मग सगळे परतीच्या वाटी लागले. ह्या अतिशय देखण्या सजावटीचे रुप मनात साठवून देवकुंड चा निरोप घेतला. परतीच्या वाटेवर कुठेही न थांबता आम्ही पोचलो आणि जरासे थकून भागून पुन्हा त्याच गावी जेवणासाठी आलो. संध्याकाळी तिथल्या मुलाचे खूप आभार मानले आणि घरची वाट धरली.

झुलता सांकव
कुंडलिका व्हॅली, ताम्हिणी घाट

देवकुंड च्या ट्रेक मध्ये एका अर्थी खूप काही होते. मधेच चढ, मधेच उतार, मधेच दाट जंगल, मधेच मोकळे मैदान. या ट्रेक मध्ये आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही की आपला ट्रेक कधी पूर्ण होईल आणि कुंडाजवळ पोहचून ट्रेक पूर्ण झाला असे वाटत नाही. पूर्ण त्राण च निघून जातो हा नजारा पाहून. येत असतात असे वेगवेगळे रस्ते आपल्या वाटेत. चालण्याचे काम करायचे आपण. ही मेहनत घेतली तरच आपल्याला त्या जागी पोहचायचा आनंद होतो, आणि हा आनंद आपण शब्दात व्यक्त करू तेवढाच कमी. घरी येताना एक गाणं ऐकलं – कुछ तो बता जिंदगी. ये जिंदगी ऐसे ही सारे राज कैसे बता देगी? फिर जिने का क्या मझा?जिंदगी तो हमेशा हमसे बात करती है, सिर्फ वो बाते क्या होती है ये जानने थोडी दुरी बनानी पडती है. ताण तणाव वगैरे येतच असतात सतत, त्यांनी खचून न जाता आपण आपल्या ठरवलेल्या वाटेवर चालत राहावे. न होणाऱ्या गोष्टीचा विचार केला की त्याचा भार वाढत जातो. हा भार हलका करायला निसर्ग मदत करतोच, किंबहुना तो यासाठी आपली वाटच पाहात असतो. कधी या ताऱ्यांचा दुनियेत आणि निसर्गात जाऊन पुनःपुन्हा संवाद साधावा. काय माहित, distract झालेल्या मनाला track वर आणता येईल, नाही का?

देवकुंड धबधबा

– चिन्मय मालगुंडकर
Pic Credits:  मंदार खर्डे, https://instagram.com/the.third.angle?igshid=acgevoy41euy

प्रतीक गाढवे, https://instagram.com/____.p_r_a_t_i_k.____?igshid=3zdzunv3i7p4

कल्पेश भुजबळ
https://instagram.com/kalpeshbhujbal?igshid=l7bfwv6m8xph