हा रिपोर्ट बघून कित्येकांचा काळजाचा ठोका चुकतो. किंबहुना टेस्ट करून आल्यावर हा रिपोर्ट येईपर्यंत जराशी धाकधूक च होत असते. फक्त त्यावेळी पुरता काही होईना, जरासं टेंशन येतच की! हाच अनुभव काही दिवसांपूर्वी मला आणि आईबाबांना आला होता…

या साऱ्या गोष्टीची सुरुवात झाली ती तापापासून. एके दिवशी मला ताप आला; आणि सायंकाळी औषधं घेऊन येईपर्यंत आईला सुध्दा जरासा ताप आला. खरं तर औषधांनी दुसऱ्या दिवशी दोघांचाही ताप उतरला, पण त्याच दिवशी हळू हळू वास जाऊ लागला. मग दुपारनंतर चवही गेली. आईला त्याच दिवशी रात्री पुन्हा थोडसं बरं नव्हतं वाटत. डॉक्टरांनी मला चेक अप साठी पुन्हा बोलावलं असल्याने माझ्यासोबत आई सुध्दा आली. आता मात्र माझी चव आणि वास पूर्णपणे गेला होता. औषधे घेऊनही आईला थकवा आला, तर आता काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला, तेवढ्यात बाबांना त्यांच्या एका डॉक्टर मित्रांचा मेसेज आला; ” उद्या माझ्याकडे मोफत ‘Antigen’ चाचणी आहे, शक्यतो करून घ्या.” बाबांना एका आठवड्या अगोदर ताप येऊन गेलेला. याच डॉक्टरांनी सांगितलेलं की टेस्ट ची गरज नाही आहे, पण तरी करून घ्या. म्हणून ४ दिवसांनी Antigen टेस्ट करायला आम्ही गेलो. माझी आणि बाबांची टेस्ट निगेटिव्ह आली, मात्र आईची पॉसिटिव्ह… आता टेस्ट पॉसिटिव्ह आलीच म्हटल्यावर Quarantine करणे आवश्यक होते. तिथेच लगेच डॉक्टरांच्या ओळखीने एका सेंटर ला आईला admit करणे शक्य झाले आणि सल्ल्यानुसार मी आणि बाबा RT-PCR टेस्ट करून आलो.

हे Quarantine सेंटर म्हणजे कल्याण मधील गोविंदवाडी इथे एक शाळा. ‘ आसरा फाऊंडेशन ‘ च्या वतीने काळसेकर शाळेचे रूपांतर Quaranatine सेंटर मध्ये करण्यात आले आहे. घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या सेंटर बद्दल काही ऐकले नव्हते. तसेच Covid च्या बऱ्याच ‘ विविध ‘ बातम्या ही शाळा असलेल्या भागातून कानी आल्या होत्या. म्हणून इथे जावे की नाही याबद्दल बरीच साशंकता होती. आईच्या लांबच्या नातलगांनी – जे डॉक्टर आहेत – त्यांनीही इथेच जाण्याचा सल्ला दिला, कारण तिथले डॉक्टर ओळखीचे होते. अजून एका दादाने सुध्दा सांगितलं की घराजवळ केलेलं बरं इथेच. म्हणून सर्वांचं ऐकून आम्ही आईला या सेंटर ला नेलं. नेलं कसलं, सेंटर वरून आईला फोन आला आणि टॅक्सी घ्यायला आली. ‘ आंटी बिलकुल टेंशन मत लो ‘, असं आईला सांगून टॅक्सी ड्रायव्हर निघून गेला. घरी दुसऱ्याच दिवशी बाबांचा RT-PCR रिपोर्ट सुध्दा निगेटिव्ह आला, माझा अजून यायचा बाकी होता. या साऱ्या गोंधळात आईने हे Quarantine सेंटर बऱ्यापैकी बरं असल्याचं सांगितलं होतं. म्हणजे माझा रिपोर्ट पॉसिटिव आला तर तिथेच Quarantine होऊ हे जवजवळ ठरले होते…

आणि दीड दिवसांनी रिपोर्ट आला. बरं, माझ्या मेल वर रिपोर्ट येण्याआधीच मला त्या quarantine सेंटर मधून फोन आला. “तुमचा रिपोर्ट positive आला आहे, तर तुम्ही लवकर सेंटर ला या.” मग आम्ही डॉक्टरांना फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितलं की सेंटर लाच जाऊद्या, तिथे काय ते नीट उपचार होतील. बाबांनी पण होकारार्थी मान डोलावली आणि मी जायला तयार झालो. आईला फोन करून म्हटलं की येतोय गं बाई सोबतीला तुझ्या. आईने कोणत्या वस्तू उपयोगी पडतील हे लगेच सांगितलं. मग बॅग भरली, फळं बिस्कीट वगैरे नाश्ता सोबत घेतला आणि एक मोठी sanitizer ची बाटली घेऊन निघालो. फक्त नवल एवढ्याच गोष्टीचं वाटलं की मेल वर रिपोर्ट येण्याआधीच तिथून फोन कसा काय आला?

आईप्रमाणे मलाही न्यायला टॅक्सी येणार होती. मी चौकात जाऊन उभा राहिलो पण याचा काही पत्ता नव्हता. तेवढ्यात एक गाडी पाहिली आणि तिथे बाजूला जाऊन उभा झालो. त्या ड्रायव्हर ने ही मीच तो ” पेशंट ” असल्याची खात्री केली आणि त्याने भर चौकात PPE किट घातला. आतापर्यंत आरामात जाणारी लोकं आता स्तब्ध होऊन गाडीत वाकून वाकून पाहू लागली. त्याने कोणा एकाला पत्ता विचारला असता मी म्हटलं की दाखवतो रस्ता! पण त्याने नकार दिला आणि मला पूर्ण फिरवून घेऊन गेला. आता या मोहल्ल्यातील सेंटर मध्ये आम्ही आलो व त्याने गाडीत बसायला सांगितलं. नंतर तिथल्या डॉक्टरांनी बोलवून रिपोर्ट मागितला असता त्यांना म्हटलं की मलाच इथून बोलावणं आलं. नंतर रिपोर्ट दाखवून मी आत गेलो आणि एक वॉर्ड बॉय मला खोलीत घेऊन गेला. खोली कसली, वर्ग च होता तो मोठा. आधी तिथल्या मुख्य डॉक्टरांनी नाव, ‘Symptomps’ आणि ऑक्सिजन लेव्हल ची नोंद करून घेतली आणि जागेवर पाठवलं. ‘ जो चाहिए वो बेड लेलो भाई ‘ हे बोलून तो निघून गेला. या रूम मध्ये एवढे पेशंट नव्हते. म्हणून सर्वांपासून लांब एका कोपऱ्यात मी बेड निवडला आणि सगळं सामान ठेऊन सेटल झालो.

मी ज्यादिवशी गेलो त्यादिवशी सर्वांचे X-rays काढायचं काम चालू होतं. लागलीच माझाही x-ray काढला आणि रूम मध्ये येऊन पाहतो तर माझ्या बाजूला २ पेशंट आले. विचारपूस केली असता कळलं की ते दोघे ICU मधून बरे होऊन २-३ दिवस Under-Observation होते. दोघांना श्वसनाचा त्रास झाला होता आणि योग्य उपचाराने ७ दिवसात पूर्णतः बरे झाले होते. या काळात त्यांचे रोज X-Ray, ३-४ वेळा ब्लड टेस्ट केलं होतं आणि सतत डॉक्टरांच्या देखरेखखाली होते. ” काही झालं तरी पेशंटने घाबरता कामा नये! “, हेच वाक्य ते सतत बोलत होते. हे बोलणं चालू असताना इंजेक्शन साठी हाताला IV लावण्यात आलं. हा ही पहिलाच अनुभव. आणि काही वेळाने दुपारचं जेवण आलं. दोन भाज्या, ५ पोळ्या आणि जरासं सलाड असा मेनू होता. जेवण झाल्यावर आजूबाजूला विचारल्यावर समजलं की इथे १० दिवस तरी राहावे लागणार! आता १० दिवस करायचं काय? काही ठिकाणी ४-५ दिवसांत घरी सोडतात हे ऐकलं होतं. आता १० दिवस इथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. तरी बरं की आईची रूम ही बाजूला च होती!

पहिल्या दिवशी संध्याकाळी इंजेक्शन आणि सलाईन देण्यात आलं. त्या आधी दुपारी डॉक्टर पुन्हा एकदा नवीन पेशंट असल्याने काय काय होतंय हे विचारून गेले आणि ऑक्सिजन लेव्हल चेक करून गेले. आता थेट रात्रीचं जेवण होतं. मधल्या वेळेत रुमच्या बाहेर फिरायला मोकळीक होती. आजूबाजूच्या लोकांशी ओळखी होत आणि फोनवर बघता बघता रात्र होत आली आणि ९ वाजता जेवून, औषधे घेऊन पुन्हा एकदा डॉक्टर तपासायला आले. कोणाला सर्दीचा त्रास वाटत असल्यास लगेच सर्दीची गोळी आणि खोकला असल्यास एक लाल रंगाचे सिरप देण्यात आले. IV च दुखणं सांभाळून झोपण्यात एक दिवस कधी गेला हे कळलेच नाही! खरं म्हणजे त्या रात्री झोप लागलीच नाही. मध्येच डोळा लागतो न लागतो तोच ‘ चिन्मय कोणे इथे?’, ही हाक ऐकू आली आणि पहाटे ४ वाजता पुन्हा सलाईन आणि इंजेक्शन देण्यात आले! हा काही अजबच प्रकार होता माझ्यासाठी.. खरं तर सर्वांसाठी. पुन्हा एकदा झोप कधी लागली आणि सकाळ ही केव्हा झाली काहीच समजले नाही.

या Quarantine सेंटर वर ३ मजल्यांवर पेशंट होते. त्यात ग्राउंड ला १०-१२ ICU बेड आणि २ माळ्यांवर प्रत्येकी ३ वर्ग. यातही महिला आणि पुरुष वेगळे पण एकाच मजल्यावर. प्रत्येक वर्गात १६-१८ बेड्स आणि प्रत्येक बेडवर ऑक्सिजन ची सोय. प्रत्येक बेडच्या बाजूला एक छोटे टेबल होते आणि दोन बेड मध्ये साधारण ३ फुटांचे अंतर होते. बाहेर २४ तास गरम पाण्याचे फिक्तर आणि दोन केबिन बांधून तिथे गिझर लावून २४ तास आंघोळीची सोय. प्रत्येक माळ्यावर ५ टॉयलेट्स होते. स्वच्छतेबाबत ही इथे तेवढीच तत्परता. दिवसातून दोन वेळा साफ सफाई करत आणि टेबल्स ही पुसत असत. सगळे कामगार ही तेवढेच तत्पर. अगदी जागेवर नाश्ता, जेवण आणि दोन वेळेचा चहा न चुकता देत होते. पेशंट ला काही हवे असल्यास लगेच मदतीला हजर. जर कोणी नातेवाईकांनी सामान पाठवले तर ते पॅक करून पेशंट पर्यंत पोहचवले जाई. डायबेटिक लोकांना ३ वेळा न चुकता इन्सुलिन दिले जाई. डॉक्टर दिवसांतून तीन वेळा तपासत आणि ऑक्सिजन लेव्हल चेक करत. तसेच ५०-५५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांचे ३-४ दिवसांनी BP चेक होत होते. इथे येणाऱ्या सर्वांची दुसऱ्या दिवशी स्वॅब आणि ३-४ दिवसांनी ब्लड टेस्ट होते. X-ray, ब्लड टेस्ट रिपोर्ट नुसार गोळ्या बदलल्या जातील, हे त्या ICU मधून बाहेर आलेल्या दोघांनी सांगितले. विशेष म्हणजे, कोरोना च्या प्रचलित टॅब्लेट सर्वांना देण्यात आल्या नव्हत्या. रोजच्या symptoms आणि ऑक्सिजन लेव्हल वरून पुढची ट्रीटमेंट ठरवत असत. एका पेशंटला जरासा ताप आला असता त्याला पिवळ्या रंगाची सलाईन लावण्यात आली होती. एका काकांची O2 लेवल कमी आली असता तिथल्या ३-४ मुख्य डॉक्टरांनी बरेच वेळा CT scan चे रिपोर्ट बघूनच त्यांना Remdesivir देण्यात आलं. एका वृध्द पेशंटची दिवसभर मॉनिटरिंग करूनच त्यांना ICU मध्ये भरती करण्यात आले. एकंदर, पूर्ण सिस्टीम ही ” Well Organised” होती!

जेवणाचा मेनू ही रोज वेगवेगळा आणि चविष्ट ! कधी छोले पुरी खीर, कधी कढी खिचडी, तर कधी टोमॅटोचे सार. सकाळी पोहे, उपमा, कचोरी, ढोकळा, शिरा तर मध्येच कटलेट. शनिवारी रात्री व्हेज बिर्याणी फिक्स! माझ्या बाजूला असलेल्या दोघांचाही ३ दिवसांनी डिस्चार्ज झाला आणि खूप आनंदाने ते घरी गेले. एकाच जागी झोपायच आणि तिथेच वावर असल्याने अंघोळीचा कंटाळाच केला. हाताला लावलेलं IV सांभाळत कशीबशी आंघोळ केली एकदाची! आणि फक्त १ तास लागला. आता ३-४ दिवसांनी IV ची ही सवय झाली आणि सगळ्या नर्स व वॉर्डबोय सोबत ओळखही झाली. तिथे सर्व नर्सेस पेशंटला सलाईन वगैरे लावत असत तर वॉर्ड बॉय हे काही हवं नको ते पाहत. बरेच जण स्टाफ ची कमतरता असल्याने २-२ शिफ्ट करत, अगदी दुपारचे डॉक्टर सुद्धा. ओव्हरटाईम, जास्त शिफ्ट ची पर्वा न करता दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत सगळे हजर! फक्त एक शिष्ट डॉक्टर सोडून बाकी संपूर्ण स्टाफ खूप चांगला होता. हे सगळे रात्रंदिवस , कसलीही अपेक्षा न बाळगता पेशंट ना बरं वाटावं म्हणून प्रयत्न करत आहेतच; पण पेशंट ने सुद्धा त्यांना साथ देणं तेवढंच महत्वाचं आहे! ४ दिवसांनी माझ्या बाजूला एक काका आले, त्यांना खोकल्याचा त्रास होता. तर हे महाशय तोंडाला मास्क न लावताच खोकत होते! अणि बाहेर फिरताना सुद्धा मास्क नव्हताच. त्यांच्या घरचे – मुलगा आणि बायको – हे दोघेही काही दिवसांनी अॅडमिट झाले. मुलगा १० वी ला असल्याने त्याचा अभ्यास चालू आणि त्यामुळे त्याची आई जेंट्स वॉर्ड मध्ये बराच वेळ बसून! शेवटी त्यांना एकदा warning देण्यात आली. आणि खोकल्यावरून सुद्धा त्यांना माझ्याच रूम मधले एक जण ओरडले. तेव्हा थोडंसं नीट राहायला सुरुवात केली. अजून एक जण आला, तो तर आल्या आल्याच सगळीकडे फिरू लागला, ते ही बिना चप्पल. ” मला काही होतच नाही ए!”, असं बोलून चकरा मारू लागला काय, व्हिडिओ कॉल करून सेंटर काय दाखवू लागला. नशीब त्याच दिवशी मला ‘Non-Covid’ वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. त्या दिवशी आईचे १० दिवस पूर्ण होऊन ती घरी गेली होती. पण covid आणि non covid एकाच मजल्यावर होते. खरी गंमत तर आता सुरू झाली.

Non-Covid वॉर्ड मध्ये ‘माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण ब्लड क्लोट्टींग होऊ नये म्हणून पोटावर इंजेक्शन दिले जातील’ हे सांगून शिफ्ट केले. आता बाहेर गेल्यावर सतत हातपाय sanitize करा, टॉयलेट ला टिश्यू पेपर घेऊन जा, आणि गरम पाणी भरून पुन्हा हात धुवा अशी कसरत चालू झाली. बाकी लोकांना आमच्या जवळ यायला, तसेच आम्हालाही बाहेर फिरायला परवानगी नव्हती. सगळे लोक झोपल्यावर आमच्या रूम मधले ३ जणं शतपावली करायला बाहेर पडत. आता माझे २ दिवसच राहिले होते. १ दिवसगोदर डॉक्टरांनी पुन्हा विचारले की सगळं ठीक आहे की नाही वगैरे.. फक्त ३ इंजेक्शन चा कोर्स हा बरोबर १० व्या दिवशी संपला आणि ११ व्या दिवशी दुपारचं जेवण झाल्यावर मला डिस्चार्ज दिला. सोबत दिले एक कार्ड. त्यावर १४ दिवस घरातच राहायला आणि वेगवेगळ्या गोळ्या लिहून दिलेल्या. ट्रीटमेंट बद्दल एक सांगायचे झाल्यास, ३-४ डॉक्टर कोणतीही क्रिटिकल केस असताना सोबत यायचे. एकदा ते काहीतरी माझ्या ब्लड टेस्ट बद्दल बोलत होत. मग त्यांनी ३ दिवस थांबून मगच इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला. खरं तर आधी सांगितले नाही, पण नंतर मला सांगण्यात आले. एकूण काय, सर्व डॉक्टर व्यवस्थित उपचार करतात. डिस्चार्ज च्या दिवशी तिथला वॉर्ड बॉय च बोलला की मी सांगतो काही असेल तर तुम्ही टेन्शन नका घेऊ. शेवटी काय आणि कोणत्या गोळ्या घ्यायच्या हे समजलं आणि ११ व्या दिवशी मी घरी आलो!

खरं तर covid आम्हाला कुठून झाला, कसा झाला याचा विचार खरं तर आम्ही तेव्हाही केला नाही आणि आता ही करत नाही. टेस्ट केल्यावर सुद्धा बऱ्याच लोकांनी आम्ही टेस्ट का केली, रिपोर्ट भलतेच येतात, असेही सांगितले. पण टेस्ट बाबत आपण जेवढे संभ्रमात आहोत, तेवढे टेस्ट करून घेणारे सुद्धा आहेत. त्यामुळे टेस्ट चा रिपोर्ट अगदी २ दिवसांनी सुधा बदलू शकतो, पण महत्त्वाचं आहे ते वेळेवर ट्रीटमेंट चालू होणं. हा काळ तसा कठीणच होता, पण या काळात मित्रांनी, नातेवाईकांनी आणि मुख्य म्हणजे डॉक्टरांनी चांगली साथ दिली. सोबत काही चांगली पुस्तकं आणि मेडिटेशन ही होतेच सोबत. आसराला गेल्यावर समजलं की प्रत्येक माणसाची त्याच्या वयोमानानुसार आणि आधीपासून असलेल्या कंडीशन नुसार ट्रीटमेंट होणं जरुरी आहे. Covid साठीच्या प्रचलित गोळ्या सर्वांना चालतील च असे नाही, कारण त्यासाठी आरामाची नितांत गरज भासते. जरी home-quarantine राहिलात तरी ब्लड टेस्ट आणि काही टेस्टसाठी बाहेर जावं लागतं. मग भांडी कपडे वेगळे ठेवा हे ही आलच. सेंटर वर असणाऱ्या वॉर्ड बॉय चे हेच बोलणे होते, मस्त १० दिन आराम करो ओर ठीक होके, खा पी कर घरपे जाओ! आराम आणि वेळेवर जेवण हेच कोरोना झाल्यावर गरजेचं आहे. आसरा फाउंडेशन सेंटर चा अनुभव हा पूर्णपणे वेगळा होता. तिथे अॅडमिट असलेल्या सर्वांचाच अनुभव छान होता. फक्त घरी आल्यावर ‘ जास्त आरामाचा ‘ थकवा जाणवला. म्हणजेच अगदी २-३ दिवस नॉर्मल रूटीन चालू केल्यावर पाय दुखले एवढंच, जे सर्वांनाच जाणवतं. हे सेंटर सरकारी असल्याने आम्हाला खर्च झाला तो फक्त गोळ्यांचा, ते ही डिस्चार्ज झाल्यावर. एकूण खर्च ०₹. सरकार, भले कुठलेही असो, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील आहेच. बरेच डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ हे निरपेक्षपणे आपले काम पार पाडत आहेतच, त्यांना फक्त गरज आहे ती सामान्य माणसाच्या साथीची. जर आपण सगळे जबाबदारीने वागलो, जर covid झाला तरीही हा आजार लवकर बरा होऊ शकतो. खरंतर या गोष्टीला झाले आता २ महिने, आता Covid चा प्रभाव कमी होत असला तरी योग्य ती काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. या संपूर्ण काळात फक्त पेशंट बरा होऊन लवकर घरी जावा या वृत्तीने काम करणाऱ्या सर्व मेडिकल स्टाफ ला सलाम!

आसरा सेंटर मधील एक वॉर्ड बॉय